मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देत नसल्याने भाजपाचा सभात्याग

0
52

Aapli Maay Marathi News Network : गेली तीन वर्षांपासून मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही, सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ केलेला नाही. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत सभात्याग केला.

७०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा अशी ठरावाची सूचना १५ मार्च २०१८ रोजी खासदार व नगरसेवक मनोज कोटक यांनी मांडली होती. तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. परंतु राज्यात सत्तेत आल्यानंतर एक वर्ष पूर्ण होऊनही शिवसेनेला मालमत्ता करमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला आहे. भारतीय जनता पक्षाकडून वारंवार मागणी करूनही सत्ताधाऱ्यांकडून मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णयावर चालढकल केली जात आहे. या विषयावर सुधार समितीत बोलताना भाजप पक्षनेते विनोद मिश्रा यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करतांना असे म्हटले की, धनाढ्य विकासकांना व कंत्राटदारांना कोविड व लॉकडाऊनच्या नावाखाली ५० टक्के सवलत देणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारला सामान्य मुंबईकरांचा विसर पडला हे दुर्दैव आहे.

सभागृहाबाहेर ५०० चौरस फुट सदनिकांना संपूर्ण कर माफीच्या वल्गना करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सभागृहात मात्र, शिवसेनेलाच साथ व हात देत करमाफीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास समर्थन केले. भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू न देता व आयुक्तांचे मत विचारात न घेताच अध्यक्षांनी सदर चर्चा गुंडाळत विषय तातडीने दफ्तरी दाखल केला. सामान्य मुंबईकराबाबत असंवेदनशील व निष्क्रिय सत्ताधारी शिवसेना- महाविकास आघाडीचा आणि उदासीन प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here