Aapli Maay Marathi News Network : राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंबाबत नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या विरोधात साधू महंत समवेत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने नाशिक येथे रामकुंडावर शंखनाद आंदोलन केले होते. मात्र आज पर्यंत वडेट्टीवार यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात साधु महंतांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोशियारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आचार्य भोसले यांचेसह श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, महंत सुदर्शन महाराज महानुभाव, महंत श्रीनाथानंद सरस्वती, महंत श्री सिद्धेश्वरांनंद, महंत धर्मराज, महानुभाव,कोकण विभाग संयोजक विकास घांग्रेकर आदि होते.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, साधुंना नालायक म्हणणाऱ्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि विधानसभेत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणता हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे का ? कारण हिंदुह्रदयसम्राटांचे तर हे हिंदुत्व नाही मग उद्धव ठाकरेंनी आता “इटालियन हिंदुत्व” स्विकारले आहे हे मान्य करावे. महामहिम राज्यपालांनी मंत्री विजय वडेट्टीवारांना शपथ दिली. त्यात त्यांनी शपथ घेतली की “कोणाविषयी आकस बाळगणार नाही”. मात्र या वक्तव्यातून साधुं विषयी त्यांचा स्पष्ट आकस दिसत असल्यामुळे त्यांनी शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. तसे न झाल्यास पुढील महिन्यात होत असलेल्या हरिद्वार कुंभमेळ्यात मोठा निर्णय घेतला जाईल.