Aapli Maay Marathi News Network : कोरोनावर जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.
ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस करोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.