वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी निर्णय – मुख्यमंत्री

0
37

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगांव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगांव हे राज्यातील 50 वे अभयारण्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत कन्हारगांव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

वन्यजीवांचा भ्रमण मार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय

व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले. याच भूमिकेतून कोल्हापूर ते कर्नाटक पर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात 8 तर विदर्भात 2 अशा 10 संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणाही शासनाने  याच बैठकीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

वाघाचे भ्रमणमार्ग होणार सुरक्षित

269 चौरस किलोमीटर क्षेत्रात कन्हारगांव अभयारण्य असणार आहे. कन्हारगांव अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व्याघ्र भ्रमणमार्गाच्या महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सिमेला जोडणारा तसेच या राज्याच्या वनक्षेत्रास सलग असलेले वनक्षेत्र आहे. कन्हारगांव अभयारण्याच्या पश्चिमेकडे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य असा भ्रमणमार्ग आहे तर तेलंगणा राज्यातील कावल अभयारण्य असा भ्रमणमार्गसुद्धा आहे. कन्हारगांवच्या दक्षिणेकडील छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प असा सुद्धा महत्त्वपूर्ण भ्रमणमार्ग आहे.

इतिहास

चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र तसेच वन्यजीव संपदेने ब्रिटीशांना सुद्धा भुरळ पाडली होती हा इतिहास आहे. येथ वाघ व इतर वन्यजीव मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यजीवांच्या शिकारीसाठी ब्रिटीशांनी खास शूटिंग ब्लॉक घोषित केलेले होते. पूर्वी इंग्रज अधिकारी शिकारीसाठी यायचे, नंतरही बरेच राजे महाराजे शिकारीसाठी यायचे. या वनक्षेत्रातील कन्हारगांव, वामनपल्ली व देवई ही ब्रिटीशांचे ‘शुटींग ब्लॉक’ आता राज्य शासनाच्या निसर्ग संवर्धनाच्या धोरणामुळे ‘अभयारण्य’ म्हणून ओळखले जातील.

आश्रयस्थळे सुरक्षित होतील

चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने  आश्रयस्थळे सुरक्षित ठेवणे गरजेचे होते आणि त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय ठरेल.

कन्हारगांव अभयारण्य घोषित झाल्याने 2013 पासून पर्यावरण प्रेमींनी रेटलेली मागणी पूर्ण झाली आहे. अभयारण्याच्या घोषणेनंतर या भागाचा विकास अधिक वेगाने होईल तसेच वन व वन्यजीवांना राजाश्रय मिळेल असा आशावाद स्थानिक वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here