अविनाश दौंड यांना निवृत्ती नाही — पद्मश्री डॉ तात्याराव लहाने

0
748

Aapli Maay Marathi News Network : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ह्यदयस्थान स्वर्गीय र. ग. कर्णिक यांचे शिष्योत्तम अविनाश दौंड हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी त्यांना कर्मचारी चळवळीतून कधीच निवृत्त होता येणार नाही असे प्रतिपादन पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथे अविनाश दौंड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यगौरव कार्यक्रमात केले.

दौंड आणि माझा पंचवीस वर्षांपासूनचा परिचय असुन ते सरकारी कर्मचाऱ्यांचे धडाडीचे नेते आहेत. यापुढेही त्यांनी राज्यातील लक्षावधी सरकारी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सीटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी एल. कराड यांनी दौंड यांचा कामगार चळवळीतील प्रदिर्घ आणि समृद्ध अनुभव पाहता त्यांनी केवळ सरकारी कर्मचारी संघटनेचे काम करुन स्वस्थ न बसता खाजगी क्षेत्रातील कामगार, विशेषतः कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रहाची सुचना केली. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दौंड यांचा बरोबर सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक वर्षे कार्य करत असुन त्यांचे मुद्देसुद आणि परखड मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरते असे प्रतिपादन केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दौंड हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असुन आम्ही दोघे एकाच छोट्याशा वाडीतले असल्याने आम्हा ग्रामस्थांना त्यांच्या कामगार चळवळ, साहित्य , प्रबोधन आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा रास्त अभिमान वाटतो असे प्रतिपादन करुन भविष्यात राज्य सरकारच्या कामगार विषयक समितीवर त्यांची नियुक्ती होऊ शकते अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयाचे संचालक रुपेंद्र मोरे यांनी दौंड यांनी ३६ वर्षे प्रामाणिकपणे शासकीय सेवा बजावून पर्यवेक्षीय पदावरून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी ३० वर्षे स्थानिक, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि आता राष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये अतिशय जबाबदारीने काम केले आहे. या कालावधीत त्यांनी नेहमीच कामगारांचे प्रश्न कुशलतेने मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.यापुढे सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आम्ही करुन घेवु असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास काटकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोकराव दगडे , महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग.दि. कुलथे , शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे व्यवस्थापक मनोज वैद्य , महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष मारुती शिंदे, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे , माध्यमिक शिक्षक कर्मचारी संघटनेचे नाना पुंदे आणि शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयीन कर्मचारी संघटनेचे सचिव पालांडे यांनी दौंड यांच्या कार्याचा समग्र आढावा घेऊन गौरव केला. या प्रसंगी श्री व सौ दौंड यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास बृहन्मुंबई मधील विविध ३२ खाते संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटना सरचिटणीस बाळकृष्ण तुरुंबाडकर, आभार प्रदर्शन अध्यक्ष संतोष डोके , संचलन कमलेश खानविलकर तर मानपत्राचे वाचन नंदकिशोर सोनावणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here