‘या’ कारणाने पुण्यातील सर्वच लसीकरण केंद्र आज राहणार पूर्णपणे बंद

0
39

पुणे : संपूर्ण देशभरात 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरण मोहीम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने परिणामी लसीकरण थांबवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज 17 मे रोजी महानगरपालिका हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून दिली आहे. लसींचा पुरवठा झाला नसल्यामुळे लसीकरण काही काळासाठी बंद करण्याची वेळ पुणे महानगरपालिकेवर आली आहे.

पुरवठा न झाल्याने यापूर्वीही पुणे महानगरपालिका क्षेत्रातील काही लसीकरण केंद्रावर लसीकरण थांबवण्यात आलं होतं. परंतु, आज लसींचा पुरवठा झाला नसल्यामुळे महानगरपालिका हद्दीतील सर्वच लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

एकीकडे सरकार लोकांनी लस घ्यावी म्हणुन जनजागृती करत आहे, आवाहन करत आहे. तर दुसरीकडे लसींअभावी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. त्यामुळे सरकारमधील समतोल नेमका कधी राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here