वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशिंवर गुन्हा दाखल करा

0
103

Aapli Maay Marathi News Network : कांदिवलीतील पालिकेच्या भगवती रुग्णालयात एका रुग्णाला भरती करण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संध्या दोशी व रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेविका दोशी यांनी कार्यरत डॉक्टराना अपमानास्पद वागणूक देत अर्वाच्य भाषेचा वापर केला. याप्रकरणी नगरसेविका दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.

शिवसेनेच्या नगरसेविका दोशी यांनी कोरोना सारख्या सामाजिक आपत्तीत आपल्या पदाचा गैरवापर करत भगवती रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात अश्लील, अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे. सद्यस्थितीत मुंबईमधील डॉक्टर सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नगरसेविका दोशी यांच्या वर्तनामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची होणार आहे. श्रीमती दोशी या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे डॉक्टरांविरोधात अरेरावीची भाषा करणारे वर्तन पदाला साजेशे नाही. त्याप्रसंगी दोशी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनेही हॉस्पिटलमध्ये मास्क घातलेला नाही. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल देखील झालेला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन नगरसेविका संध्या दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना डॉक्टरांची माफी मागायला लावावी. तसेच त्यांचा शिक्षण समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा त्वरित घ्यावा अशी आग्रहाची मागणी भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य श्री. कर्पे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here