आगामी निवडणुका स्वबळावरच लढवेल – नाना पटोले

0
29

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे आज नाना पटोले दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना पटोलेंनी दिल्यामुळे राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी राज्यात मोठी स्पेस असल्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. राहुल गांधी यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली. यापुढील काळात राज्यात पक्षवाढीसाठी काय केले पाहिजे, यासाठी बैठकीत चर्चा झाली. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचे नाना पटोले म्हणाले.

त्याचबरोबर विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत तीन वर्षानंतर हायकमांड निर्णय घेईल. पण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, हे नाना पटोलेंनी स्पष्ट केले. त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली काढणार असल्याचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here