गुजरातप्रमाणेच पूरग्रस्त महाराष्ट्रालाही केंद्र सरकारने तातडीने मदती द्यावी : रोहित पवार

0
80

मुंबई : प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. अनेकांच्या संसाराची पुरामुळे वाताहत झाली आहे. या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता समोर आला आहे. यावरून केंद्र सरकारच्या मदतीसाठी आता राज्यातील नेते प्रयत्नशील दिसत आहेत.

महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 701 कोटीची मदत मंजूर केली आहे. पण ही मदत मागच्या वर्षी आलेल्या पुरात ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आल्यामुळे आताच्या पूरग्रस्तांसाठी काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे.

अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेले असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभे करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे, मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here