तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसाणीसाठी मोदींची गुजरातसाठी १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा

0
40

नवी दिल्ली : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला तोक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी वादळग्रस्त भागाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये गुजरातमधील वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर देशभरात तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान केंद्रीय पथक गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी पाठवले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीशी समांतर गेलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागात वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमधील वीजपुरवठा, रस्तेवाहतूक विस्कळीत झाली. पण गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमाभागातील गावांना बसला आहे. गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा लँडफॉल सुरू झाला, तेव्हा किनारी भागातील एकूण २४०० गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. वीजेचे हजारो खांब उन्मळून पडले आहेत. या भागातील तब्बल १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून तब्बल ४० हजार झाडे उन्मळून पडली आहेत. तब्बल १६ हजार ५०० घरांचे नुकसान झाले असून किनारी भागातून तब्बल २ लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.

दरम्यान, तोक्ते चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना देखील बसला असल्यामुळे देशात ज्या ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला आहे, तिथे मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या मदतनिधीची देखील घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here