सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ

0
147

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीमध्ये आहेत. आज त्यांची कोठडी संपल्यामुळे त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केले. अधिक तपासासाठी एनआयएकडून सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. विशेष एनआयए कोर्टाने ही मागणी मान्य करत सचिन वाझेंची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असत असून त्या प्रकरणी देखील सचिन वाझेंची चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक खुलासे झाल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश महाराष्ट्र एटीएसला दिले होते. त्यानुसार हा तपास आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोन आरोपी यांना एनआयएला हस्तांतरीत करण्यात आलं.

सचिन वाझेंविरोधात एनआयएला आधी अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात पुरावे मिळाल्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सचिन वाझेंचाच हात असल्याची बाब समोर आली आहे. सचिन वाझे यांच्याशी संबंधित या प्रकरणातील ७ ते ८ कार एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय या प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक शिंदे आणि बुकी अशा दोघांनीही या प्रकरणात सचिन वाझेंचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यासोबतच, जिलेटिनच्या कांड्या सापडलेली कार हरवल्याची माहिती मनसुख हिरेन यांनी पोलीस जबाबात दिली होती. पण ती कार स्वत: मनसुख हिरेन यांनीच सचिन वाझेंना दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एनआयएला तपासामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील मिठी नदीमध्ये सापडल्या आहेत. या पुराव्यांमधून सचिन वाझेंचा प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट होत असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. याशिवाय, तपास एनआयएकडे जाण्याच्या भितीनेच सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याच्या निष्कर्षाप्रत एनआयए आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here