लसीकरणाची नितांत गरज असताना ‘याकडं’ केंद्र सरकारने लक्ष द्यावं- रोहित पवार

0
84

मुंबई : सध्या भारतात फक्त सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना लस उत्पादन करण्याची परवानगी मिळाली आहे. भारतात लसीकरण जलद गतीनं होण्यासाठी अतिरिक्त लस उत्पादन करण्याची गरज आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी लसीचा फाॅर्म्युला अन्य कंपन्यांना देण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

केंद्र सरकारच्या मालकीच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या इंटीग्रेटेड व्हॅक्सिन काॅमप्लेस (आयव्हीसी) या संस्थेत वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. पण असं असतानाही येथिल यंत्र सामग्री सध्या बंद आहे. आज देशाला लसीकरणाची नितांत गरज असताना याकडं केंद्र सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

एकतर केंद्र सरकारने स्वतः तातडीने इथं लस उत्पादन सुरू करावं किंवा सीरम इंस्टिट्युट किंवा भारत बायोटेक या कंपन्यांकडं संचलन दिलं तरी तिथं लस उत्पादन सुरू करता येईल, असं रोहित पवार म्हणाले. तर शक्य असल्यास राज्य सरकारनेही ही जबाबदारी उचलण्याबाबत विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, लसीचा सध्या सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतीय लसीकरण मोहिम थंडावलेली दिसत आहे. महाराष्ट्र राज्याने एकट्याने आतापर्यंत 2 कोटी नागरिकांनाचं लसीकरण केलं आहे. तर बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यात लसीकरण मोहिम कासवासारख्या धीम्या गतीनं चालू आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यासाठी उत्पादन वाढवणं भारतासाठी गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here