शाश्वत विकासासाठी निसर्गाचे पावित्र्य जपणे आवश्यक : राज्यपाल

0
84

मुंबई : भारत हा अनादी काळापासून निसर्गपूजक देश आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांना आपल्या परंपरेत देवत्व दिले आहे. पर्यावरण व हवामानातील मोठ्या बदलांमुळे अनेक संकटे निर्माण होत आहे. या संकटांवर मात करून शाश्वत विकास साधायचा असेल तर सर्वांना निसर्गाचे पावित्र्य जपावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

गोवर्धन इको व्हिलेज व सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांनी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पर्यावरण बदल या विषयावर भारत-अमेरिका परिषदेचे आयोजन केले, त्यामध्ये दूरस्थ माध्यमातून सहभागी होताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

या ऑनलाईन परिषदेत गोवर्धन इको व्हिलेज प्रकल्पाचे संस्थापक राधानाथ स्वामी, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रांझ, उद्योगपती अजय पिरामल, भारताचे न्युयॉर्क येथील वाणिज्यदूत रणधीर जयस्वाल तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, भारतात पृथ्वीला माता म्हणतात आणि देशाला मातृभूमी म्हणतात. मनुष्याने पृथ्वीचे तसेच निसर्गाचे शोषण न करता तिचे पावित्र्य जपले पाहिजे. भारत व अमेरिका ही दोन मोठी लोकशाही राष्ट्रे शाश्वत विकासासाठी एकत्र कार्य करीत आहेत, ही आश्वासक बाब आहे. राधानाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गाल्तरे, पालघर जिल्ह्यातील गोवर्धन इको व्हिलेज ही संस्था शाश्वत विकासासाठी चांगले कार्य करीत असल्याबद्दल श्री.कोश्यारी यांनी प्रशंसोद्गार काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती अभियानाचे उद्घाटन केल्याचे सांगून प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी भारत कटिबद्ध असल्याचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here