हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, भाजप हारला कोरोना जिंकला

0
26

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये भाजपवर कुरघोडी करत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला 200 जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला असतानाच भाजपला 100 जागांवरही विजय मिळवता आला नाही. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधलं आहे.

काल देशातील एकूण पाच राज्याचे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पण यात पश्चिम बंगालची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून ओळखली जात होती. “ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आणि मोदी-शहा यांनी उभं केलेलं तुफान रोखून त्यांचा डाव शंभरच्या आता ऑल आऊट करुन टाकला. बंगालची जनता धुक्यात हरवली नाही आणि कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, ठामपणे उभी राहिली. देशाने या बंगालच्या जनतेकडून शिकायला हवं”, अशा प्रकारे संजय राऊत यांनी अग्रलेखात ममता बॅनर्जी यांच्या विजयावर भाष्य केलं आहे.

“ममता बॅनर्जी यांनी अतिशय जिद्दीने हा विजय मिळवला असून हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे.” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे. या अग्रलेखातून ममता बॅनर्जी यांचं तोंड भरून कौतुकही केलं गेलं आहे. ऐन निवडणुकीत वाघिण जखमी झाली आणि त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली. असा उल्लेख ममता बॅनर्जी यांचा केला गेला आहे तसेच ‘भाजप हरला आणि कोरोना जिंकला’ असं एका वाक्यात निवडणुकीचं विश्लेषण अग्रलेखात करण्यात आलं आहे.

या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपच्या हाती व्यक्तिगत निवडणूक करून देखील काय लागलं? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधान व गृहमंत्री निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात, तेव्हा जय-पराजयाचं श्रेयही त्यांनी स्वीकारायचं आणि राजकारणात तीच परंपरा आहे, असं अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना डिवचण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here