तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?

0
35

मुंबई : इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करून जगातील 1400 लोकांचे फोन हॅक केले दावा करण्यात आला आहे. तर 300 भारतीय तसेच काही पत्रकारांचे देखील फोन टॅप झाल्याचा दावा 15 मीडिया संस्थांनी केलाय. याच मुद्द्यावरून आता देशभरात वातावरण तापलेलं दिसत आहे. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात काँग्रेसला दोषी ठरवलं होतं. त्यावर आता नवाब मलिक यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले होते. फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. हा देशाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मनमोहन सिंग आणि विविध सरकारांकडून फोन टॅपिंग कशा प्रकारे करण्यात आले, याची त्यांनी माहिती दिली होती. तर संसदेचं कामकाज चालू न देण्यासाठी काँग्रेस गोंधळ घालत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.

आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यास प्रत्त्युतर दिलं आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात ज्यांनी ज्यांनी असे प्रकार केले, त्यांच्यावर मनमोहन सिंग यांनी कारवाई केली होती. आता भाजप सत्तेत आहे. त्यांनी देखील कारवाई करावी, असं नवाब मलिक म्हणाले. नुसतं देशाला बदनाम करण्याचा दावा करू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान,फोन हॅकिंग प्रकरणात करण्यात आलेला दावा सरकारने याआधी फेटाळून लावला होता. सध्या दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पेगॅसस फोन हॅकिंग प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसने गोंधळ घातला आहे. आज देखील याच मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here