दामोदर शिंगडा यांच्या निधनाने आदिवासींचा कैवारी हरपला! : नाना पटोले

0
27

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दामोदर शिंगडा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा कैवारी हरपला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

दामोदर शिंगडा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून आलेल्या दामोदर शिंगडा यांनी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते सक्रिय राजकरणात आले. लोकांशी जुळलेली नाळ व दांडगा जनसंपर्कामुळे शिंगडा आदिवासी समाजात अत्यंत लोकप्रिय होते. सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणा-या दामोदर शिंगडा वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. पोशेरी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळा आणि विद्यालयं सुरु करून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

दामोदर शिंगडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिंगडा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here