योगीजी, अहो योग्य ते बोला….

0
346

आपली माय मराठी न्यूज नेटवर्क:

देशातील सर्वात मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात आता बाहेरच्या राज्यातून सुमारे २३ लाख मजूर आपल्या स्वगृही म्हणजे स्वराज्यात परत गेले आहेत.. साहजिकच अचानक परतलेल्या या लोकांचा ताण राज्यावर येणार. त्यांची व्यवस्था करताना दमछाक होत असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ही आपल्याकडे असलेली संपत्ती असल्याचे लक्षात येताच तिच्यावर मालकी गाजवायला सुरूवात केलीय. एवढेच नाही तर आता या मजूरांची मागणी जे राज्य करेल त्यांनी आधी उत्तर प्रदेश सरकारकडे परवानगी मागावी, असा नवा नियम केलाय.


योगी आणि युक्तिवाद:
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाल्यानंतर एका विशिष्ट धार्मिकतेला कसे बळ मिळत गेले. त्यातून सांस्कृतिक उन्माद आणि जातीय विद्वेषाची बीजं गोरक्षकांच्या आडून कशी पेरली गेली आणि त्याचा परिपाक म्हणून कशा हत्या, हल्ले झाले याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जोपर्यंत राज्यात भाजपप्रणित सरकार होते तोपर्यंत महाराष्ट्राला सल्ले द्यावेत, सूचना कराव्यात असे या योगींना कधी वाटले नाही. मात्र, गेल्या महिन्यात पालघरमध्ये संशयातून झालेल्या साधूंच्या हत्येनंतर योगींनी त्वरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुरध्वनी वरून त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून दिली. पण योगींचा दैवदुर्विलास आणि योगायोग म्हणजे त्यानंतर दोनच दिवसांत उत्तर प्रदेशातही साधूंच्या हत्या झाल्या मग सह्याद्रीने त्याचे उट्टे काढले नसते तरच नवल. सांगण्याचे तात्पर्य असे की, योगींना अलिकडे महाराष्ट्रात ब-याच उणिवा दिसू लागल्या आहेत. टाळेबंदीच्या काळात गावी परतणा-या मजूरांसाठी महाराष्ट्रानं रेल्वे उपलब्धतेशिवाय परतणा-या मजूरांच्या तिकिटाची आणि जेवणा खाण्याची व्यवस्थाही केली. पण औरंगाबाद येथे झालेल्या मजूरांच्या अपघातानंतर आणि काही किरकोळ घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परप्रांतीय मजूरांसोबत अमानवीय व्यवहार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यांच्यालगतच्या राज्यातून मुंबईत येऊन खासदार झालेल्या संजय निरूपम यांनी तर उत्तर भारतीय मजूर मुंबईतून गेला तर मुंबई बंद पडेल असा दावा केला होता.


मुंबई मजूरांची माय..
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उत्तर भारतातून स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही मोठ्या प्रमाणात मजूर कामाधंद्याच्या शोधात स्थलांतरित झाला. त्यातून दिल्ली पाठोपाठ मोठ्या प्रमाणातच मजूर मुंबई नगरीत दाखल झाला. इथल्या भूमीपुत्रांच्या हक्कांच्या आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरही या नगरीने आणि राज्याने या मजूरांना आश्रय दिला आणि रोजरोटी दिली. आजमितीला मुंबईत फेरीवाले, पाणीपुरीवाले, मासळी विकणारे, टॅक्सी चालवणारे, नाका कामगार आणि बांधकाम मजूर त्यातही रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणारे असे लाखो कामगार काम करीत आहेत. मुंबईच्या जडणघडणीत यांचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. तो नाकारून चालणार नाही. परंतू याच कामगारांच्या जीवावर उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये समृद्धीची वाटचाल करीत आहेत.

काम मुंबईत पैसा उत्तर भारतात..
मुंबईत काम करणा-या पन्नास टक्के उत्तर भारतीय मजूरांची कुटूंबे गावी असतात. उरलेल्यापैकी बहुतांश लोक मुंबईत घर घेण्याऐवजी भाड्याने राहणे पसंत करतात. कारण त्यांना मिळवलेला पैसा आपल्या गावी पाठवायचा असतो. तिथे जमीन आणि टोलेजंग घर बांधायचे असते. ते सहज म्हणतात आमचं इथं काय आहे जे आहे ते गावी.. काही उत्तरभारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातही काम करतात. त्यांनी मात्र मुंबईलाच माय मानून इथं वास्तव्याची तयारी केली.

देशांतर्गत स्थलांतराचे स्वातंत्र्य…
जम्मू आणि काश्मिर वगळता देशांतर्गत स्थलांतराचे स्वातंत्र्य आणि अधिकार घटनेनेच दिला असल्याने स्थानिक भूमिपूत्रांनी कितीही ओरड केली तरी परप्रांतीयांचे मुंबईत येणारे लोंढे कधीही कमी झाले नाहीत. यामध्ये मुस्लिम उत्तरभारतीयांचा भरणा अधिक असतो. उलट आता मुंबई, ठाण्याची धारणक्षमता संपल्यानंतर या मजूरांनी महाराष्ट्राच्या अन्य शहरांमध्ये हातपाय पसरायला सुरूवात केली. यात पुणे, औरंगाबाद, नासिक, कोल्हापूर, भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर, पालघर यांचा समावेश आहे. पण तरीही महाराष्ट्राने काही अपवादाच्या घटना आणि शिवसेना मनसेने केलेली आंदोलने वगळता कधीही या परप्रांतीय मजूरांना हुसकावून लावण्याचा अथवा त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट सन्मानाने दोनवेळच्या जेवणाची भ्रांत मिटवली.

योगीजी तेव्हा का नाही रोखले मजूरांना?
गेल्या साठ, सत्तर वर्षांपासून महाराष्ट्र या परप्रांतीय मजूरांना आत्मीयतेने पोसतो आहे. हा मजूर रेल्वे भरभरून मुंबई महाराष्ट्र येताना त्यांना योगीजींनी कधीही रोखले नाही. मजूर परत स्वगृही आला तर तुमच्या यंत्रणा कोलमडून पडताहेत मग हेच परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्राने कसे पचवले असतील चा विचार करा. तुमचे एवढे मनुष्यबळ डोळ्यासमोरून जात असताना का अडवले नाही. कारण तुमची तेव्हा अडवण्यासारखी परिस्थिती आणि मानसिकता नव्हती. उत्तर प्रदेशातील हे मनुष्यबळ महाराष्ट्रात धावत येते कारण त्यांना इथे रोजगार मिळतो उत्तर प्रदेशात नाही. महाराष्ट्राच्या रस्त्यावर येऊनच फेरीचा धंदा करावा लागतोय कारण महाराष्ट्रातील लोकांची क्रयशक्ती ही उत्तर प्रदेशच्या लोकांपेक्षा जास्त असल्याचं ते द्योतक आहे. योगीजी तुम्ही या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करायच्या घोषणा (की वल्गना) करून त्यांना थांबवणार आहात म्हणे. रोजगार एका रात्रीत निर्माण होत नसतात त्यासाठी औद्योगिक, भौगोलिक, सामाजिक परिस्थीती पोषक असावी लागते. ती आहे का याचा आधी विचार करा मगच आचरट अपेक्षा करा. राज ठाकरे यांनी तुमच्या या नव्या नियमाला उत्तर देताना आता महाराष्ट्रात येणारा मजूर नोंदणी आणि पोलीस तपासणी करूनच यावा, असं आवाहन करणारं पत्र राज्य सरकारला लिहिलंय.. उत्तर प्रदेशातील रितीरिवाज, शैक्षणिक परिस्थिती आणि गुन्हेगारीचं प्रमाण बघता तुमच्या नियमानं तुम्हीच स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्याचं तुमच्या लक्षात येईल. योगीजी अहो योग्य तेच बोला कधीतरी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here